नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इको स्पोर्ट कार सहा लाख 50 हजार रुपयांत विक्री करून देतो, असे सांगून विश्वास संपादन करून कार घेऊन जात 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीकांत रघुनाथ कुंभार (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभार हे हेल्थकेअर प्रोफेशनल असून, फिर्यादीत म्हटले आहे, की गंगापूर रोड येथील दक्ष फ्लोरा व काठे गल्ली येथील भागीरथी एजन्सीचा आरोपी राजेश पगार याने फिर्यादीशी कटकारस्थान करण्याच्या उद्देशाने दुसरा आरोपी काफिल मेमन याच्याशी संगनमत करून फिर्यादीची इको स्पोर्ट कार ही 6 लाख 50 हजार रुपयांत विक्री करून देतो, असा विश्वास संपादन करून फिर्यादीची कार सोबत घेऊन गेला.
त्यानंतर फिर्यादीकडून येस बँकेच्या खात्यावरून आयएमपीएसद्वारे राजेश पगारे याने त्याच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर 50 हजार रुपये, गुगल पेद्वारे 50 हजार रुपये, बँक ऑफ बडोदाच्या राधिका सुपर मार्केट येथील खात्यावरून 5 लाख रुपये, दि. 22 एप्रिल 2025 रोजी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर 2 लाख रुपये, दि. 24 एप्रिल 2025 रोजी फिर्यादीच्या येस बँकेच्या खात्याचा 3 लाख 89 हजार रुपयांचा बेअरर चेक घेऊन टोकन अमाऊंट म्हणून 11 हजार रुपये रोख स्वरूपात घेऊन, एमएच 02 ईयू 0568 या क्रमांकाची स्कोडा कोटियाक कार 20 लाख रुपयांत विक्री करून अधिकचे दोन लाख रुपये देतो, असे खोटे आश्वासन दिले.
त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये आरोपीने काफिल दिलावर मेमन याच्याशी ओळख करून त्याने राजेश पगार हा त्याचा एजंट असल्याचे सांगितले व फिर्यादीकडून 9 लाख रुपये दोघांनी रोख स्वरूपात घेतले. अशा प्रकारे वाहन विक्रीच्या व्यवहारात आरोपी राजेश पगार व काफिल मेमन यांनी कटकारस्थान रचून फिर्यादीची 29 लाख रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे करीत आहेत.