नवी मुंबईतील तुर्भे परिसरात १३ मार्च रोजी एका 50 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. या घटनेने तुर्भे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आणि आरोपीला नेपाळमधून अटक करण्यात आली असून धक्कादायक कारण पुढं आलं आहे.
नेमकं काय घडलं ?
तुर्भे गावात 50 वर्षीय मर्जीला मंडल या महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. 13 मार्च रोजी दुपारी धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे पुढे आले होते. एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. चौकशीत बीडच्या किशनगंजचा रहिवासी असणाऱ्या मोहम्मद अख्तर याच्यावर संशय बळावला होता. याप्रकरणात पोलिसांनी वेगात तपास सुरु केला.
तांत्रिक तपासावरून आरोपी नेपाळला असल्याचे समजले. पोलिसांनी झापा जिल्ह्यातील डांगी गाव गाठले आणि आरोपी मोहम्मद अख्तरला ताब्यात घेतले.आरोपी मोहम्मद अख्तरच्या पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मर्जीला मंडल ही वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत होती. मोहम्मद अख्तर याने साडेचारशे रुपये दिले. मात्र, तरीही त्याला अपेक्षित महिला न पुरवल्याने त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात अख्तर याने मर्जीला मंडलवर चाकूने वार करून तिला संपवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.