स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांची संयुक्त कामगिरी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गेल्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी हे दोघे शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेले असताना, अज्ञात आरोपीने त्यांच्या चेहर्यावर शरिरावर अॅसिड टाकून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस मित्र चांगदेव मोरे व त्याचा साथीदार सचिन कोटमे या दोघांना अटक केली असल्याची माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
तालुका पोलीस ठाण्यातील पत्रकार कक्षात या अॅॅसिड हल्ला प्रकरणी अधिक माहिती देताना स्वामी म्हणाले की, येवला तालुका पोलीस ठाण्यास गुरनं 231/2026 भा. न्या. सं. कलम 124(1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व तपास पथकांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक यांनी तपास पथकांसह घटनास्थळ व आजुबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली.
तसेच या घटनेतील जखमी दाम्पत्याकडे या घटनेबाबत माहिती घेवून तपास सुरू केला. तपास पथकाने यातील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांचे दैनंदिन शेती कामकाज व त्यांचे कोणासोबत वाद होते काय, याबाबत गोपनीय माहिती घेवून चौकशी केली असता, त्यांचे गावातील चांगदेव मोरे याच्याशी वाद होते व त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. या इसमाचे शेत हे जखमींच्या शेताच्या बाजूलाच होते. गुन्हा घडल्यापासून संशयीत इसम हा तपासादरम्यान पोलीसांसोबतच होता, तसेच तो पोलीस मित्र देखील आहे. तपासादरम्यान तो पोलिसांची दिशाभूल करीत होता, त्यास घटनेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची तसेच माहितीबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने, त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने या शेतकरी दाम्पत्यावर अॅॅसिड फेकल्याची कबुली दिली आहे.
त्यामुळे या गुन्ह्यात चांगदेव देवराम मोरे (वय 40), सचिन जालिंदर कोटमे (वय 20, दोघेही रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक) या दोघांना अटक केली आहे. या घटनेतील जखमी भाऊसाहेब बोर्डे व आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपी मोरे याच्याबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनात धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री शेतकरी दाम्पत्यावर अॅसिड हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.
दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, येवला तालुका पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक, पोउनि हर्षवर्धन बहिर, पोउनि दिघे, स्थागुशाचे पोउनि शैलेश पाटील, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार प्रशांत पाटील, सागर काकड, चंद्रकांत निर्मळ, नवनाथ वाघमोडे, निलेश सावकार, आबा पिसाळ, ज्ञानेश्वर सानप, बाबासाहेब पवार, येवला तालुका पो.स्टे. चे सपोउनि थेटे, पोहवा भरत कांदळकर, सागर बनकर, गणेश सोनवणे, गणेश बागुल, पोकॉ सुरवाड, तसेच तांत्रिक विभागाचे पोवा हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे.