आजकाल विवाहबाह्य संबंधातून होणारे भाडणं, हत्या आत्महत्या अशा अनेक गंभीर घटना घडत आहेत. दरम्यान आता अशाच एका घटनेतून एका तलाठयाने आपली जीवनयात्रा संपवली असल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे लग्नाच्या अवघ्या १२ दिवसांनंतर एका तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हीघटना २५ मे रोजी घडली आहे. या आत्महत्येमागचे गूढ अखेर समोर आलं आहे. पत्नीचे लग्नाच्या आधीपासून असलेले अनैतिक संबंध या आत्महत्येला कारणीभूत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी मृत तलाठ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय उर्फ गणेश दत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय तलाठ्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले तलाठी धनंजय कोळी यांचा विवाह नुकताच दीपाली नावाच्या तरुणीसोबत झाला होता. दीपाली ही अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, धक्कादायक वास्तव समोर आलं. दीपालीचे लग्नाच्या आधीपासूनच एका दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब लपवून तिने धनंजय यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतरही ती सातत्याने तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती आणि फोनवर तासनतास बोलत असे.
धनंजय यांना पत्नीच्या वर्तनावर संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. मात्र, सुरुवातीला तिने खोटी माहिती देऊन धनंजय यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धनंजय यांच्या हाती दीपालीची वैयक्तिक डायरी लागली. या डायरीमध्ये तिने आपल्या अनैतिक संबंधांबाबत सविस्तर लिखाण केले होते. हे सत्य समोर येताच धनंजय यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आणि याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर मृत धनंजय कोळी यांच्या आई सुनंदा कोळी यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत मृत्यूस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी दीपाली कोळी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.