माझ्या नंतर माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल ? नैराश्यात आईनं घेतला टोकाचा निर्णय
माझ्या नंतर माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल ? नैराश्यात आईनं घेतला टोकाचा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
बंगळुरूमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही काळापासून गंभीर नैराश्यात असलेल्या आईने माझ्या नंतर माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल? या काळजीतून मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली आहे. सुवर्णा चंद्रशेखर (४५) असे आईचे नाव आहे.  सुवर्णा चंद्रशेखर आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह घरात सापडला. तपासानुसार, सुवर्णा या गेल्या काही काळापासून गंभीर नैराश्यात होत्या. पती चंद्रशेखर यांना असलेल्या हृदयाच्या आजारामुळेही त्या प्रचंड तणावात होत्या.

आत्महत्येच्या दिवशी काय घडलं ?
सोमवारी रात्री कुटुंबाने एकत्र बसून क्रिकेट मॅच पाहिली आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन  जेवण केले.घरी परतल्यानंतर सुवर्णा यांनी पतीला मी खूप थकले आहे, उद्या सकाळी नाश्ता बनवणार नाही, असं सांगितले होते. मंगळवारी सकाळी पती चंद्रशेखर नाश्ता बाहेर करून कामावर निघून गेले. त्यांनी वारंवार फोन करूनही सुवर्णा यांनी फोन उचलला नाही, तेव्हा त्यांनी आपल्या भावाला घरी पाठवले. सकाळी ११ च्या सुमारास खिडकीतून पाहिले असता, सुवर्णा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या, तर मुलगी बेडवर मृतावस्थेत होती.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सुवर्णा यांनी आधी गाढ झोपेत असलेल्या मुलीचे तोंड उशीने दाबून तिचा श्वास रोखला. मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी स्वतः छताच्या पंख्याला लटकून आयुष्य संपवले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

दरम्यान, पती चंद्रशेखर यांनी आपल्या पत्नीविरुद्ध स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याची तक्रार दिली आहे. दुसरीकडे, सुवर्णा यांचे भाऊ मंजुनाथ यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करत दुसरी तक्रार दाखल केली आहे. यामागे काही दबाव होता का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group