बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी अपघाताचा बनाव करत एक लाखाची सुपारी देत आपल्या पत्नीची हत्या केलीय. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं ?
२ मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या पिंपळगाव काळे येथे ड्युटीवर जात असताना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांच्या स्कुटीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक याठिकाणी पोहोचले तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे आपली बायको गेल्याने रडत बसला. त्यावेळी पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. मात्र, वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घातपाताची शंका बोलून दाखवली अन खेळच उलटला.
घटनेची अधिक तपास पोलिसांनी सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्याआधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहूळकर या दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकप चालक असलेला मंगेश सूर्यवंशी याला एक लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणण्यास सांगितले. 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिक्षिका वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केलं.
जळगाव - जामोद पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून काही तासातच तीनही आरोपींना गजाआड केलं व न्यायालयासमोर हजर केलं असता काल तिन्ही आरोपीना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.