२० गुंठे जमिनीचा वाद पेटला, वडील आणि भावाचा सख्खा भाऊच वैरी ठरला
२० गुंठे जमिनीचा वाद पेटला, वडील आणि भावाचा सख्खा भाऊच वैरी ठरला
img
वैष्णवी सांगळे
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर भीषण रक्तरंजित घटनेत झाले. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे रविवारी दुपारी मोठ्या मुलाने वडिलांसह धाकट्या भावाचा कुर्‍हाड आणि खोर्‍याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. या दुर्दैवी घटनेत वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) आणि धाकटा भाऊ शितल मारुती कुंडले (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे. 



प्राथमिक माहितीनुसार, कुंडले कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. या जमिनीच्या तुकड्यावरून दोन भावांमध्ये वारंवार खटके उडत असत, ज्यामुळे घरात नेहमीच तणावाचं वातावरण असायचं. रविवारी सायंकाळच्या सुमारास याच शेतजमिनीच्या कारणावरून संभाजी, शितल आणि वडील मारुती यांच्यात पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली.

हा वाद वाढत गेल्यानंतर संभाजीला संताप अनावर झाला. त्याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने वडील आणि लहान भावावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, मारुती कुंडले आणि शितल कुंडले दोघंही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दोघांचा जागीच मृत्यू झाला.धक्कादायक म्हणजे २० गुंठे जमिनीसाठी हा वाद सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी संभाजी कुंडले याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group