शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे अज्ञात व्यक्तींनी सुकेन महातो ( मूळ रा. पश्चिम बंगाल) या परप्रांतीय युवकाची निर्घृण हत्या केली आहे. 'आपले घर' या हॉटेलच्या पाठीमागे सुकेनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. याप्रकरणी तुळशीराम महातो यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या खून प्रकरणी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
ममता बॅनर्जी यांची पोस्ट
पुणे, महाराष्ट्र येथे पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील बंडवान येथील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेन महतो यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे मन सुन्न झाले आहे. आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असलेल्या या तरुणाची अशी क्रूर हत्या होणे अत्यंत संतापजनक आणि वेदनादायक आहे. ही घटना साधी गुन्हेगारी नसून द्वेषातून घडवलेला गंभीर गुन्हा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका तरुणाला त्याची भाषा, ओळख आणि मूळ यामुळे लक्ष्य केले गेले, त्याला छळण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली, हे अत्यंत अमानुष आहे. समाजात वाढत चाललेल्या परप्रांतीयांविषयीच्या द्वेषपूर्ण वातावरणाचे हे परिणाम असल्याची टीका करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सुखेन महतो यांच्या कुटुंबीयांना या दु:खद प्रसंगी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान , घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. शिरूर येथील न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाला बोलावून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे जतन करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
मयत सुकेन महातो हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने तो या भागात राहत होता. त्याची हत्या जुन्या वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलिसांकडून सखोलपणे केला जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदतही घेण्यात येत असल्याची माहिती आहे.