दुसरा नवरा चांगला मिळावा म्हणून आईचं पोटच्या गोळ्यासोबत संतापजनक कृत्य, सिमेंटच्या...
दुसरा नवरा चांगला मिळावा म्हणून आईचं पोटच्या गोळ्यासोबत संतापजनक कृत्य, सिमेंटच्या...
img
वैष्णवी सांगळे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदाती आईच 11 महिन्यांच्या पोटच्या मुलासाठी काळ ठरलीय.  अवघ्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून आईने हत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुरड्याचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. मात्र, रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत या क्रूर घटनेचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भांबर्डे येथील रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी आपला 11 महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना सुरुवातीपासूनच मुलाची आई, पूजा रवींद्र पवार हिच्या वागण्यावर संशय येत होता. पोलिसांनी जेव्हा पूजा पवारची कसून चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. 

 दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही," आपण जर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन गेलो, तर कोणीही पाहणार नाही, आपल्याशी कोणीच लग्न करणार नाही असा विचार तिच्या मनात आला. आणि त्यामुळेच या मार्गातून मुलाला दूर करण्यासाठी तिने त्याचा काटा काढण्याचा कट रचला.

त्यानंतर आरोपी महिला पूजा हिने अवघ्या 11 महिन्यांचा मुलाची हत्या केली. तिने तिच्या लहान मुलाचं, यशचं डोकं हे सिमेंटच्या ओट्यावर आपटलं आणि त्याचा खून केला, अशी कबुली तिने दिली. एवढंच नव्हे तर या बद्दल कोणालाही कळू नये, गुन्हा उघडकीस येऊन नये, तो लपवण्यासाठी म्हणून तिने तिच्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरला. आणि नंतर तिने ती बॅग शेतातील एका विहीरीत टाकून दिली. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जन्मदात्या आईकडूनच एवढा अमानुष प्रकार घडल्याने नागरिक संतापले असून लहान मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती, पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group