'मला निर्दोष मुक्त करा'..., स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज
'मला निर्दोष मुक्त करा'..., स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटले आहे. मात्र अद्याप देखील आरोपीविरोधात न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. त्यातच आता आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज केला आहे. या अर्जांवर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच आरोप निश्चिती होऊन खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी पीडिता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे.

प्रकरण काय ? 
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये ३७ वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे घटनास्थळावरून फरार होता, तो आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. १२ दिवसांची पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार काम पाहत असून, पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत.

दरम्यान आरोपी दत्ता गाडेने जामीन मिळण्यासाठी केलेले दोन्ही अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे; तसेच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्ततेसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. 

तपासात काय समोर आले ?
शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर दोघांचे केस व आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे. आरोपीच्या मोबाइल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये आरोपी दत्ता गाडेचा डीएनए जुळला असल्याची माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group