पुण्यामध्ये हत्याकांडाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन लेकरांवर प्राणघातक हल्ला केला. जन्मदात्या आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण खून केला, तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.
माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात ही थरारक घटना उघडकीस आली. सोनी संतोष जायभाय असं आरोपी मातेचं नाव आहे. रागाच्या भरात किंवा मानसिक तणावातून सोनी हिने आपला ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली तर त्यानंतर तिने आपली १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, पोटापाण्यासाठी ते वाघोली येथे स्थायिक झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.