पुण्यातील राजगुरुनगर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. राजगुरूनगर येथे खासगी कोचिंग क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार घडलाय. शिक्षक शिकवत असतानाच क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने मित्रावर जीवघेणा हल्ला केला. शिक्षक शिकवत असताना अचानक हा मुलगा उठला त्याने सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला आणि मित्रावर सपासप वार केला.
या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.13 ते 14 वर्ष वयोगटातील ही मुलं आहेत. 8 वी आणि 9 वी वर्गातील मुलांचा क्लास एकाचवेळी सुरु होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरुन लागलीच पसार झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
हा हल्ला का करण्यात आला यामागचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.