मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र आहे. २ डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन, असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले. मात्र सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही दिग्विजय पाटील यांनी स्पष्ट केले.
दिग्विजय पाटील यांच्या चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने, आता पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दिग्विजय पाटलांवर जमीन प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काल शीतल तेजवानीला याच प्रकरणात अटक करण्यात आलीय. त्यानंतर आता दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल आहे. त्यातच अमेडिया कंपनीची 99 टक्के भागिदारी असलेले पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार आहे.