पुण्यात भोंदूगिरीची घडलेली घटना सर्वानाच आश्यर्यचकित करून सोडणारी आहे. बरं या कुटुंबाची काही हजारांची नाही तर तब्बल १४ कोटींची फसवणूक झाली आहे. कोट्यवधींची फसवणूक झाल्यांनतर या हतबल कुटुंबाला अखेर जाग आली आणि त्यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
पुण्यात उच्चशिक्षित इंजिनिअर दाम्पत्याला जाळ्यात ओढून तब्बल १४ कोटी रुपयांना फसवल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. आपल्या मुलींच्या दुर्धर आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी तळमळत असलेल्या दीपक डोळस आणि त्यांच्या शिक्षक पत्नीला दीपक खडके या व्यक्तीने वेदिका पंढरपूरकरकडे नेले. वेदिकाने तिच्या अंगात शंकर महाराज येत असल्याचे सांगून दांपत्याला आमिष दाखवले.
वेदिका पंढरपूरकरने त्यांच्या पैशांमध्ये दोष असल्याचे आणि मुलींच्या उपचारासाठी ते आपल्या बँक खात्यात वळते करण्यास सांगितले. त्यानंतर, कुटुंबाच्या घरातील दोष दूर करण्याच्या नावाखाली इंग्लंडमधील बंगला, फार्म हाऊस आणि पुण्यातले घर विकून पैसे वळते करण्यास भाग पाडले. मुलींच्या आजारपणामुळे हतबल दांपत्य सर्व काही करत राहिले. पण मुलींच्या आरोग्यावर काही परिणाम जाणवला नाही.
अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुणे पोलिसांकडे १४ कोटींच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, तक्रार दाखल होताच वेदिका पंढरपूरकर तिच्या पतीसह पुण्यातील महात्मा सोसायटीतील आलिशान बंगल्यातून गायब झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने पुण्यासारख्या शिक्षित शहरातही अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.