पुणे महापालिका निवडणकीच्या तोंडावर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पुण्यातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ज्यांच्यावरती फार्म गिळल्याचा आरोप आहे ते उद्धव कांबळे यांनी प्रभाग क्रमांक ३६ मधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उद्धव कांबळे यांच्यावरती प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप झाला त्यानंतर याचीच चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरु होती.
मात्र काल पुण्याच्या राजकारणात जे नाराजी नाट्य रंगलं त्यावरून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव कांबळे यांना खडसावलं देखील होतं, त्यानंतर आता उद्धव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मधील शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार उद्धव कांबळे यांनी अखेर माघार घेतली. उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे माघार घ्यावी लागल्याचे सांगण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आदेश दिल्यानंतर कांबळेंनी माघार घेतली. आता या प्रभागात शिंदे गटाचे मच्छिंद्र ढवळे हे अधिकृत उमेदवार असतील. उद्धव कांबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने ढवळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचं म्हटलं होतं. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा त्यांनी दावा केला होता. मच्छिंद्र ढवळे यांनी एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवल्याने आपल्याला राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याचं उद्धव कांबळेंनी म्हटलं होतं