लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका लोकप्रतिनिधीला उपचारासाठी पहाटे तासभर वणवण फिरावे लागल्याने अहमदपूरमधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या शाहूताई कांबळे यांच्या वेळेवर उपचार न मिळाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे अचानक शाहूताई यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. म्हणून कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण पहाटेची वेळ असल्यामुळे शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. अखेर त्यांना ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना जर जवळपास 20 मिनिटांपूर्वी उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते.. असं देखील सांगण्यात येत आहे. शाहूताई कांबळे यांच्या जाण्याने संपूर्ण प्रभागात शोककळा पसरली आहे.
शाहूताई कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांना विशेष पाठिंबा देऊन निवडणुकीत उभे केले होते आणि त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पुढाकार घेतला होता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शाहूताई आपल्या प्रभागातील लोकांसाठी नेहमीच आवाज उठवत असत. २०१७ च्या निवडणुकीतही त्या अवघ्या १२ मतांनी पराभूत झाल्या होत्या, पण लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम होता. बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले होते.