राज्यातील महापालिकांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित करत बोगस मतदार शोधून काढण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्याचे आणि असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याची खातरजमा करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते.
त्यानुसार आता राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा शोध घेतला जात असून आत्तापर्यंत १५ लाख दुबार मतदार सापडले आहेत. सर्व महापालिकांचा विचार करता पाच ते 20 टर्क्क्यांपर्यंत दुबार मतदार आढळून आले असून मुंबई महापालिकेत हे प्रमाण ७ टक्के असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
मनपाच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे.
नमूद केलेले मतदान केंद्र वगळता उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.