मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयागाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा ठिकाणी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ही माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली.
या निवडणुका कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये होणार आहेत. मतदारांना जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी असे दोन मते द्यावी लागतील.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी - १६ जानेवारी ते २१ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
नामनिर्देशनपत्रांची छाननी - २२ जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी
मतदान - ५ फेब्रुवारी (सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे.