दैनिक भ्रमर ( नाशिक ) : काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र निवडणूका लढवणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता यावर आज नाशिकमध्ये बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या युतीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्येही आम्ही एकत्र लढू. यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली या महानगर पालिकांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथं आमची एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची ही वज्रमूठ तोडू शकत नाही," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.