मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शेवटच्या टप्प्यातील शिवतिर्थावरील आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज प्रचार संपुष्टात येईल. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी अखेरच्या टप्प्यात आपले हुकमी मुद्दे काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याची कॉपी करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप करतानाचे मागच्या २० वर्षांतील काही निवडणूक व्हिडीओ दाखवले. शिवतीर्थावरील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे ते व्हिडोओ’ म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडीओ भर सभेत दाखवले. उत्तर हे ठाकरे बंधूंनीच दिलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना चांगलचं डिवचलं आहे.
मी कुणाकडून तरी शब्द उधार घेतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कच्या सभेत जुन्या व्हिडीओंना एकत्र तयार करून केलेला मीम स्वरुपातील व्हिडीओ दाखवला. त्यानंतर रात्री हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडीओ ३ मिनिटे १९ सेकंदाचा आहे. यात राज ठाकरे शिवसेनेतून का बाहेर पडलो, हे सुरुवातीला सांगताना दिसतात. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका. तसेच उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना राज ठाकरेंनी त्यांना दिलेली साथ आणि नंतर हेच सभेतून कसे सांगितले? याच्या क्लिप या व्हिडीओत आहेत.
राज ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचीही क्लिप यात आहे. ज्यात उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, असे म्हणताना दिसतात. उद्धव ठाकरे बोलतात एक करतात दुसरेच, असेही राज ठाकरे म्हणतात.