मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहे. दरम्यान ठाकरे ब्रँडची महापालिका निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपाचं गणित सुटलं आहे. दरम्यान काही प्रभागात इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. काही ठिकाणी जागा एकमेकांसाठी सोडाव्या लागल्या. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे बंधु एकत्र आले आहेत, पण कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
मनसेला मुंबईतील वॉर्ड क्रमांक ९७ मध्ये भाजपकडून खिंडार पाडण्यात आलं आहे. मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे नाराज असलेल्या जुन्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
मनसेच्या स्थापनेपासून हे पदाधिकारी पक्षासोबत होते. अनेक वर्षे निष्ठावंत कार्यकर्ते मनसेसाठी काम करत होते, परंतु उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मशाल चिन्हावर उमेदवारी दिल्याने मनसेच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला.
भाजपकडून वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला रिगंणात आहेत तर बाळा चव्हाण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी, प्रभाग 98 मधून दीप्ती काते यांना तिकीट झाल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांचा दीप्ती काते यांना विरोध आहे.
तर दुसरीकडे चांदीवलीत उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तीन शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे राजीनामे देण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक 161,159,157 इथल्या शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
प्रभाग क्रमांक 161 मध्ये पैशासाठी मराठी बहुल विभागात मागील वेळी एमआयएम मधून निवडणूक लढवलेला मुस्लिम उमेदवार देण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. उमाकांत भांगिरे,प्रशांत नलगे,बाळकृष्ण गटे या शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे.