शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, जागावाटपावर मात्र पडदा
शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, जागावाटपावर मात्र पडदा
img
वैष्णवी सांगळे
अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होता, त्या ऐतिहासिक युतीची ठाकरे बंधूंनी आज घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत, युतीची घोषणा केली. तब्ब्ल 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले असून राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच टाळ्यांचा क़डकडाट झाला.  मात्र युतीबाबत जाहीर केलं असलं तरी दोन्ही पक्षांतर्फे जागावाटपाची घोषणा झालेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या महापालिका निवडणुकीत कुठे, किती जागा लढवणार यावर अद्यापही पडदा आहे. 

वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो, असे सांगितले. माझी एक मुलाखत झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाषण केले. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group