महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. विशेष म्हणजे परवाच बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला असून त्यामध्ये उद्धव ठाकरेंबरोबर युती केलेल्या राज ठाकरेंना मोठा फटका बसला आहे. यावरुन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधुंवर टीकेची झोड उठलेली असतानाच राज यांनी भेटीचा अचूक टायमिंग साधून नेमका कोणाला इशारा दिला आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरेंनी फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुढील काही दिवसांत बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरलाअसतानाच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.