मनसे आणि शिवसेना युतीची आज घोषणा होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र येत आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच कारमधून प्रवास करत शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. थोड्याच वेळात राज आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते युतीची घोषणा करतील. त्याचसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करतील.
मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणावले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रही भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करुन जाताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एका चिमुकलीने चाफ्याचं फुल दिलं.