उबाठा पक्षाचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना "आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे," असे म्हणत थेट सभागृहातच ऑफर देऊ केली. त्यानंतर, सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
राजकीय वर्तुळात या ऑफरची आता चांगलीच चर्चा होत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीत तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अँटी चेंबरमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामध्ये, विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची माहिती आहे.
हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाहीये,
त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते.