मराठी माणूस, ज्या ऐतिहासिक क्षणांची वाट पाहत होता, त्याचा उभा महाराष्ट्र साक्षीदार झाला. दोन ठाकरे एकत्र आले. क्षण याची देहि, याची डोळा मराठी जणांनी आज पाहिला. ठाकरे ब्रँड हा उभ्या भारताने पाहिला. मराठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण सुरू होताच राज्य सरकारला ठोकायला सुरूवात केली. त्यांच्या टीका, चिमट्या आणि भाषिक फिरक्यांनी सभागृह आणि सभागृहा बाहेरील भाग दणाणून गेला. त्यांच्या स्फोटक शब्दांनी अनेकांच्या मनाचा ठाव घेतला आणि मराठी भाषेच्या बाजूने धडाक्यात घोषणा सुरू झाल्या.
अनेकांच्या अंगावर शहारे आले. राज ठाकरे आजच्या भाषणात राज्य सरकारवर तुटून पडले. त्यांच्या भाषणाने मराठी माणसाला अंतर्मुख केले तर राजकारण्यांना झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बहारदार भाषणाने बाळासाहेब ठाकरे यांची आठवण अनेकांना झाली.
आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी माता भगिनींनो, अशी केली. खरं तर दोघांची भाषणं संपल्यावर एकत्र आरोळ्या ठोका. खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मोर्चा निघायला हवा होता, असे राज ठाकरे यांनी आग्रहाने म्हणणे मांडले.
मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं, असे राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर अचूक निशाणा साधला. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली, असा खणखणीत टोला त्यांनी हाणला.
२० वर्षानंतर दोघे एका मंचावर
आजचा मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रिनवर आटपा. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यातून या गोष्टी सुरू झाल्या,. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. २० वर्षानंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.
आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय, दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.