मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून शिवसेनेने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे.
थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार योगेश पाटील विजयी झाले आहेत. नगरसेवक पदांच्या निकालात शिवसेनेचे २१, भाजप १, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया २ अशा महायुतीला एकूण २४ जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला १, काँग्रेसला १ आणि अपक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले.
पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांनी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख केली. एकूण नऊ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी आठ टेबलांवर ईव्हीएम मशीनची, तर शेवटच्या टेबलावर टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ ते ८, तर दुसऱ्या फेरीत ९ ते १६ प्रभागांची मतमोजणी झाली.
मतमोजणीपूर्वी उमेदवार व प्रशासनामध्ये काही काळ वाद निर्माण झाला. उमेदवारांनी आक्षेप नोंदवल्यानंतर पत्रकारांसह कोणत्याही कर्मचाऱ्यास मोबाईल फोन आत नेण्यास मनाई करण्यात आली. मतमोजणीसाठी उमेदवार समर्थकांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पहिल्याच फेरीत नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील हे २१ मतांनी आघाडीवर राहिले.
दरम्यान, समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. स्ट्राँग रूम परिसरात काही काळ धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. आपला उमेदवार आघाडीवर असल्याचे समजताच समर्थकांनी केंद्राबाहेर जल्लोष केला. मात्र विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये खेळाडूवृत्तीचे दर्शन घडले.
थेट नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत शिवसेनेचे योगेश पाटील यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत २१ मतांची आघाडी दुसऱ्या फेरीत ७०१ वर पोहोचली. तिसऱ्या फेरीत ही आघाडी २,००८ मतांपर्यंत वाढली. चौथ्या फेरीत १,४१२, पाचव्या फेरीत १,५००, सहाव्या फेरीत २,६०२, सातव्या फेरीत २,५०३, आठव्या फेरीत २,२०५, नवव्या फेरीत २,२७० आणि दहाव्या फेरीत २,१२४ मतांची आघाडी त्यांनी कायम ठेवली. अकराव्या व अंतिम फेरीअखेर योगेश पाटील हे २,१५५ मतांनी विजयी झाले.
अंतिम निकालानुसार योगेश पाटील यांना १७,०४६, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण नाईक यांना १५,२९१, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रवींद्र घोडेस्वार यांना ६,९५२, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शुभम चुनियान यांना ३७८, बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे यांना ५५८, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नितीन जाधव यांना १,२५६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार निमदेव हिरे यांना १३३, तर राजू निरभवणे यांना १४३ मते मिळाली.
या निवडणुकीत एकूण ४२,४३१ मते वैध ठरली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ‘नोटा’ला २७४, तर नगरसेवकपदासाठी ‘नोटा’ला १,१६८ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 1 -
अ - रुपाली सुनील हांडगे (शिवसेना) 1272
ब - दिनेश दिलीप पाटील (शिवसेना) 1043
प्रभाग क्रमांक 2 -
अ - पूजा तुषार लालसरे (शिवसेना) 1544
ब - शबाना सादिक पठाण (शिवसेना) 1035
प्रभाग क्रमांक 3 -
अ - पद्मा सुरेश उबाळे (शिवसेना) 1091
ब - मुस्तक (बब्बू) फकीर कुरेशी (काँग्रेस) 1072
प्रभाग क्रमांक 4 -
अ - मुकुंद गौतम एळीजे (भाजप) 856
ब - कमल विजय सांगळे (शिवसेना) 1815
प्रभाग क्रमांक 5 -
अ - रेश्मा रत्नदीप पगारे (अपक्ष) 630
ब - कमलाबाई वाल्मिक आंधळे (शिवसेना) 1314
प्रभाग क्रमांक 6 -
अ - महेंद्र गोपाळ शिरसाठ (शिवसेना) 1531
ब - उषा दिलीप तेजवणी (शिवसेना) 1396
प्रभाग क्रमांक 7 -
अ - असमा सादिक तांबोळी (शिवसेना) 1735
ब - अमजद रशीद पठाण (शिवसेना) 1820
प्रभाग क्रमांक 8 -
अ - रेश्मा प्रशांत बनसोडे (शिवसेना) 1080
ब - मजीद इब्राहिम शेख (शिवसेना) 1030
प्रभाग क्रमांक 9 -
अ - सुजाता प्रवीण नाईक (शिवसेना उबाठा) 1721
ब - राकेश विनोद ललवाणी (शिवसेना) 1722
प्रभाग क्रमांक 10 -
अ - निवडणूक स्थगित
ब - निवडणूक स्थगित
प्रभाग क्रमांक 11 -
अ - मंगला कैलास हिरणवाळे (शिवसेना) 1697
ब - अमीन पटेल (शिवसेना) 1945
प्रभाग क्रमांक 12 -
अ - रुपाली राजेंद्र पगारे (शिवसेना) 1668
ब - डॉ सुहास आप्पासाहेब जाधव (शिवसेना) 1239
प्रभाग क्रमांक 13 -
अ - सविता साईनाथ गिडगे (शिवसेना) 1985
ब - अमोल दिलीप नरवडे (ठाकरे गट) 1175
प्रभाग क्रमांक 14 -
अ - शारदा राहुल अहिरे (रिपाइं) 819
ब - विशाल राजेंद्र अहिरे (रिपाई) 1667
प्रभाग क्रमांक 15 -
अ - संतोष पुंजाजी अहिरे (राष्ट्रवादी) 1069
ब - पूजा लोकेश साबळे (शिवसेना) 834
प्रभाग क्रमांक 16 -
अ - मोनिका राजेंद्र अहिरे (शिवसेना) 1653
ब - दीपक वाल्मिक दराडे (ठाकरे गट) 1115
क - रेखा संजय कटारे (ठाकरे गट) 1252