“नाशिकला येतो… कार्यकर्त्यांना बळ देतो” – पण ते शब्दच राहिले शेवटचे; स्व.अजितदादांच्या त्या भेटीने आजही डोळे पाणावतात
“नाशिकला येतो… कार्यकर्त्यांना बळ देतो” – पण ते शब्दच राहिले शेवटचे; स्व.अजितदादांच्या त्या भेटीने आजही डोळे पाणावतात
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- राज्याचे धुरंधर नेते व उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार आणि पवार कुटुंबीयांचे नाशिकशी नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे.

नाशिकच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेल्या चढ-उतारांची त्यांना कायमच चिंता होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी “५ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या शनिवार-रविवारी दोन दिवस नाशिकमध्ये थांबतो” असे आश्वासन त्यांनी दिले होते.

मात्र काळाने वेगळाच डाव साधला…तो नाशिक दौरा प्रत्यक्षात कधीच घडू शकला नाही, ही जाणीव आजही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मनाला बोचते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या त्या शेवटच्या भेटीच्या आठवणी सांगताना भावना आवरता येत नव्हत्या. बोलता-बोलता त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या.

२४ जानेवारी रोजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, जाकीर शेख, अनिल चौगुले, हेमलता पाटील, अतुल मते  हे सकाळी मुंबईत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. नाशिकहून पदाधिकारी आले असल्याचे समजताच अजितदादांनी आपुलकीने विचारपूस केली. सकाळी दहा वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येतील, तेव्हा सविस्तर चर्चा करू, असे सांगत त्यांनी चहा-नाश्त्याचीही आपुलकीने व्यवस्था केली.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीतील अपयशावर अजितदादांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

“पराभव का झाला, कुठे चुकलं?” याचा सविस्तर आढावा घेत त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्धार व्यक्त केला.
“५ फेब्रुवारीनंतर  शनिवार-रविवारी नाशिकला येतो. दोन दिवस थांबून संघटना मजबूत करू, पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवू,” असे ठाम शब्द त्यांनी त्या वेळी उच्चारले.

आज त्या शब्दांची आठवण काढताना, हीच भेट शेवटची ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे सांगताना निवृत्ती अरिंगळे यांचा आवाज भरून आला.

नाशिकसाठी दिलेले ते आश्वासन, ती आपुलकी, तो विश्वास…
आजही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात अपूर्ण राहिलेल्या भेटीची वेदना म्हणून जिवंत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group