नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सातपूर -गिरणारे रस्त्यावर मंगळवारी (दि. ३) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले पाच मित्र मंगळवारी एमएच ४६ एन ९४४२ या क्रमांकाच्या अल्टो मारूती वाहनातून सकाळी फिरण्यासाठी गिरणारे परिसरातील कश्यपी धरणावर गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना सुमारे साडेपाचच्या सुमारास सातपूर-गिरणारे रस्त्यावर त्यांचा चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार चार ते पाच पलट्या घेत रस्त्याच्या कडेला उलटली.
या अपघातात सार्थक रहाणे (वय २१, रा. जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) हा तरुण जागीच ठार झाला. उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत सार्थक रहाणे याच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी सातपूर-गिरणारे रस्त्यावर वारंवार होणार्या अपघातांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सार्थक रहाणे हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले आहे. आई घर सांभाळून मुलाचे शिक्षण करीत होती सार्थक हा फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.