नाशिक : वो बुलाती है मगर जाने का नही ! तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवला अन ५३ लाखांचा गंडा घातला
नाशिक : वो बुलाती है मगर जाने का नही ! तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवला अन ५३ लाखांचा गंडा घातला
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून तरुणाशी संपर्क साधून मैत्री व प्रेमाचे आमिष दाखवून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये जादा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीने 53 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पुरुष हा नाशिक येथे राहतो. या तरुणाशी सानवी खुराणा या तरुणीने फेसबुक प्रोफाईल व वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांद्वारे संपर्क साधला. तिने फिर्यादीला मैत्रीचे व प्रेमाचे आमिष दाखविले. त्यावर विश्‍वास ठेवून दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यानंतर तरुणीने क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट मिळवून देण्याच्या नावाखाली एक बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते ओपन केल्याचे भासविले. त्यानुसार वरील नमूद टेबलप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविलेल्या विविध यूपीआयडी व युनिटी स्मॉल फायनान्सच्या खात्यावर फोन पे व आरटीजीएसद्वारे पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर नमूद प्लॅटफॉर्मवर आभासी पद्धतीने ही रक्कम कोट्यवधीच्या स्वरूपात वाढलेले असल्याचे भासविले.

त्यानंतर या रकमेकरिता वेळोवेळी तरुणीच्या सुबान गुरू यांचे ट्रेडिंग कमिशन प्रतिदिवसाला एकूण 30 टक्के रकमेकरिता असे गुंतवणूक व कमिशनकरिता एकूण 52 लाख 93 हजार 228 रुपये भरण्यास भाग पाडले. क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग खात्यावरील रक्कम डेबिट करण्यासाठी पुन्हा 34 लाख रुपये भरण्यास सांगितले; मात्र हे पैसे भरण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे संशयित तरुणीने दोघांच्या संमतीने एकमेकांस अश्‍लील फोटो व व्हिडिओ पाठविले होते.

हे फोटो व व्हिडिओ पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून शिवीगाळ करून फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी दिली, तसेच 53 लाख रुपयांची फसवणूक करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न संशयित तरुणीने केला. हा प्रकार दि. 18 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान ऑनलाईन इंटरनेट व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर घडला.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सानवी खुराणा नामक तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group