नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- शिंदे गाव येथील एका प्लास्टिक कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.
पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गावातील प्लास्टिक कंपनीत अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. कंपनीत प्लास्टिक दाण्याचा साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली. याबाबतची माहिती गुळ कंपनीचे मालक ज्ञानेश्वर रामचंद्र तुंगार (रा. शिंदे गाव) यांनी प्लास्टिक कंपनीचे मालक अमजत मुसा शेख (रा. इंदिरानगर, कॅनाल, जेलरोड) यांना दूरध्वनीवरून दिली.
माहिती मिळताच शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आग विझविण्यासाठी नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. तसेच स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य जळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिस यंत्रणेला देण्यात आली असतानाही दुपारी सुमारे ३ वाजेपर्यंत कोणताही अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचला नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.