नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील मोहदरी शिवारात अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकार्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शांताराम काकड (वय 38, रा. खर्जुल मळा, सिन्नर फाटा) हे पांगरी बुद्रुक येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 6 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वरिष्ठांच्या आदेशानुसार ते खासगी वाहनाने अवैध गौण खनिज वाहतुकीवर पाळत ठेवत होते.
मोहदरी शिवारात त्यांना विनानंबरचा एक टाटा 912 मॉडेलचा टिप्पर मुरूम वाहतूक करताना दिसला. काकड यांनी टिप्पर थांबवून रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, चालक अमोल अर्जुन भिसे याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. मंडल अधिकार्यांनी गाडी सिन्नर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितल्याचा राग आल्याने चालकाने गाडी नाशिकरोडच्या दिशेने पळवली.मंडल अधिकारी काकड यांनी पाठलाग करून चिंचोली फाट्याजवळील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयासमोर टिप्पर अडवला. यावेळी चालक अमोल भिसे याने त्यांची गच्ची पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही वेळातच ब्रीझा गाडीतून अतुल धुळाजी भिसे आणि अर्जुन भिसे तिथे आले. आरोपी अतुल आणि अर्जुन यांनी काकड यांना पकडून ठेवले, तर अमोल भिसे याने टिप्परमधून लोखंडी कोयता काढून मंडल अधिकार्यांच्या मानेच्या दिशेने भिरकावला. नशिबाने हा वार चुकला.याच वेळी आरोपींनी त्यांच्या इतर दोन साथीदारांना बोलावून या सर्व घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सांगितले आणि ‘तुला जिवंत सोडणार नाही‘ अशी धमकी दिली.
अखेर काकड यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. याचा फायदा घेत काकड यांनी तिथून सुटका करून घेतली. या घटनेनंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी अमोल अर्जुन भिसे, अतुल धुळाजी भिसे, अर्जुन भिसे आणि इतर दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.