नाशिक : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी अन कंपनी मालकाकडे मागितली एक कोटीची खंडणी
नाशिक : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी अन कंपनी मालकाकडे मागितली एक कोटीची खंडणी
img
Prashant Nirantar
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनीबाबत खोट्या तक्रारी करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कंपनीमालकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या मेहुणी व साडूसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गोविंद गौरीशंकर झा (रा. अश्‍विननगर, अंबड) हे व्यावसायिक असून, त्यांची अंबड व सिन्नर येथे कंपनी आहे. झा यांचा साडू राजीव वसंत चौधरी यांच्याकडे कोणतेच काम नसल्याने त्यांनी साडूला मदत व्हावी म्हणून स्वत:च्या कंपनीत कामाकरीता आणले. दरवर्षी त्यांना 5 लाख रुपये पगार देण्याचे ठरले. परंतु चौधरी हे दोन महिन्यांत काम करून निघून गेले.

दरम्यान चौधरी यांना मुंबई येथे बंगला घ्यायचा होता. मात्र त्यांचे सिबिल खराब असल्याने त्यांना कोणतीच बँक कर्ज देत नव्हती. म्हणून झा यांनी त्यांना नंदिनी इंडस्ट्रीज व नमन इंडस्ट्रीज अशा दोन कंपन्या सिन्नर येथे सुरू करून दिल्या व त्याचे अकाऊंटींगचे काम झा यांच्या अकाऊंटंटकडे दिले. ऐवढे करुन देखील चौधरी दाम्पत्य कंपन्यांच्या पैशांची अफरातफर करत होते. ही बाब लक्षात येताच झा यांनी दोन्ही कंपन्यांचा त्यांच्याकडून राजीनामा घेतला. व त्या कंपन्या स्वत:च्या नावावर केल्या.

या गोष्टीचा राग मनात धरून दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास कंपनीमालक झा यांची मेहुणी वंदना राजीव चौधरी, साडू राजीव वसंत चौधरी व वसंत चौधरी (सर्व रा. ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली ईस्ट, मुंबई) यांनी फिर्यादीशी संपर्क साधला.

तीनही आरोपींनी संगनमत करून भारत सरकारचे कंपनी सेक्रेटरी दीपल बिर्‍हाडे यांना मेल करून फिर्यादीच्या कंपनीबाबत जीएसटी ऑफिस, डीआयसी, एमआयडीसी, एनसीएलटी व एमसीए पोर्टल येथे खोट्या तक्रारी करून तुम्हाला अडकवून टाकू, अशी धमकी देऊन झा यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group