नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विविध मैत्रीणींसोबत असलेले जुने व्हिडिओ व फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे 12 लाखांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अवघ्या 5 तासांत अटक केली आहे.
याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. अनोळखी आरोपींनी फिर्यादीच्या कार्यालयातील टॅबची चोरी करुन त्यामध्ये असलेले विविध मैत्रीणींसोबतचे जुने व्हिडिओ व फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपये खंडणी स्वरुपात स्वीकारुन फिर्यादीचे न्यूड फोटो व व्हिडिओ फिर्यादीला व्हॉट्सॲप केले होते.
या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करुन त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या होत्या. दोन्ही पथकाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व मांडणी कौशल्य तसेच स्थानिक बातमीदाराकडून माहिती प्राप्त करुन या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. हे आरोपी आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने त्यांचा शोध घेतला असता हे आरोपी रस्त्याच्या बाजूला असलेल्या बंद गाळ्याच्या पाठिमागे लपल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घेराव घातला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे आकाश पुंडलिक बकरे (रा. अशोकनगर, सातपूर), प्रकाश रामदास पानपाटील (रा. सातपूर कॉलनी), सूरज सुनील गवई (रा. मोतीवाला कॉलेजजवळ, सातपूर) व श्रीपत भीमराव शिंदे (रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर) अशी असल्याचे सांगितले.
त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्य पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, गुन्हे शाखा युनिट क्र. 2 चे सपोनि हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, अंमलदार शंकर काळे, पोलीस हवालदार महाजन, आहेर, खरपडे, दराडे, पारस देशमुख, महेश खांडबहाले, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे, सोनू खाडे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.