नाशिक : शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी 62 टँकर तैनात स्थायी समिती सभापतींचे आदेश : कृत्रिम पाणीटंचाईचा असाही फटका
नाशिक : शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी 62 टँकर तैनात स्थायी समिती सभापतींचे आदेश : कृत्रिम पाणीटंचाईचा असाही फटका
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक शहरातील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून गंभीरपणे विस्कळीत असून नागरिकांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता प्रत्येक प्रभागासाठी दोन असे शहरात एकूण 62 टँकर सुरू करण्याचे आदेश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे ओढवलेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा नाशिककरांना असा फटका बसला आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. त्यात पाणीपुरवठ्यावरून सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. दोन दिवसांचा शटडाऊन असताना तब्बल 5 दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने केवळ 35 टँकरद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात होता. 4 आणि 5 एप्रिल रोजी मनपाने मुख्य पाइपलाइन व जलशुद्धीकरण केंद्रांवरील दुरुस्ती कामांसाठी दोन दिवसांचा शटडाऊन घेतला होता. मात्र, त्या कामांनंतरही पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्याने शहरातील सहाही विभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  

अनेक भागांत पाणीपुरवठा अनियमित असून दाब कमी आहे, तर काही ठिकाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुरुस्ती कामांनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. काही भागांत येणारे पाणी वापरण्यायोग्यही नाही, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.  स्थितीचे गांभीर्य मान्य करत मच्छिंद्र सानप यांनी सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांत त्यांना नागरिकांकडून 200 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सानप यांनी पाणीपुरवठा विभागाला शहरातील सर्व सहा विभागांत टँकरची संख्या वाढवून समप्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत प्रत्येक प्रभागात किमान दोन टँकर कार्यरत ठेवावेत, असे आदेश दिलेत. गेल्या तीन ते चार दिवसांत शहराच्या पाणीपुरवठ्यात 11 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) इतकी वाढ करण्यात आली. यामुळे एकूण पाणीपुरवठा 614 एमएलडीवरून 625 एमएलडीपर्यंत वाढविण्यात आला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत शहराला सुमारे 600 एमएलडी पाणीपुरवठा होत होता. सदस्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागात 2 टँकरची व्यवस्था करण्यात येईल, असे मनपा पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group