भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे संपण्याचे नाव घेत नाही आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचा लैंगिक शोषण करणारा खरातचा नवा कारनामा समोर आला आहे. खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून आता खरातवरील दाखल गुन्हयांची संख्या १२ वर पोहोचली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषण आणि महिलांचा छळ यांच्याशी संबंधित आहेत, तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.
अशोक खरातच्या जाळ्यात एक कांदा व्यापारी अडकला. खरातने व्यापाऱ्याला प्लॉट विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्याने व्यापाऱ्याकडून ६० लाख रुपयांची जागा केवळ २२ लाख २५ हजार रुपयांत वृद्धाश्रमाच्या नावावर खरेदी केली. इतकेच नाही, तर खरातने व्यापाऱ्याला वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर दुसरी जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणात त्याने व्यापाऱ्याकडून एकूण ८५ लाख रुपये उकळले, पण ना जागा दिली, ना पैसा परत केला.
फसवणूक उघडकीस आल्यानंतर जेव्हा व्यापाऱ्याने आपले पैसे आणि जागेचा तगादा लावला, तेव्हा अशोक खरातने त्याचा मानसिक छळ सुरू केला. त्याने व्यापाऱ्याला धमकी देत म्हटले, “जागेसाठी तगादा लावू नकोस, नाहीतर तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल.” अशा प्रकारे अनेक दिवस व्यापाऱ्याला मानसिक त्रास देत खरातने त्याला घाबरवत ठेवले होते.
सध्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खरातच्या संपर्कात आलेले आणखी किती लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.