छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय पूजा सुदाम गावंडे या तरुणीचा तिच्याच प्रियकराने भरदिवसा गळा चिरून निर्घृण खून केला. गुरुवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पूजा गावंडे ही तरुणी पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामात व्यस्त असताना तिचा ३२ वर्षीय प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे आला. दोघांमध्ये सुरुवातीला काही वेळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला.
हे संपूर्ण हत्याकांड पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडीओमध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे हल्ला करताना दिसत असून, घटनेनंतर परिसरात एकच पळापळ झाली. भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावरील पंपावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..
प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे. याच वादातून सत्यमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी सत्यम गावंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.