धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडवाडी येथे सोमवारी मध्यरात्री रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अजित अणप्पा वासुदेव (वय ३०) याने किरकोळ वादातून आपली पत्नी लिंबाबाई (वय २४) आणि ८ वर्षांची मुलगी मानसी यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुहेरी हत्याकांड घडवल्यानंतर आरोपी अजित मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा अजित आणि त्याची पत्नी लिंबाबाई यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि अजितने घरात असलेल्या कुऱ्हाडीने पत्नी व मुलीवर सपासप वार केले. यावेळी त्यांचा ४ वर्षांचा लहान मुलगा घरातच होता, मात्र भांडण आणि रक्ताचा सडा पाहून तो प्रचंड घाबरला आणि घराबाहेर पळाला, ज्यामुळे त्याचे प्राण सुदैवाने वाचले. अजितला एकूण दोन मुली आणि एक मुलगा असून मोठी मुलगी आजोळी असल्याने ती या संकटातून बचावली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह मुरूम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुहेरी हत्याकांडातील मृतांची नावे लिंबाबाई अजित वासुदेव आणि त्यांची 8 वर्षीय मुलगी मानसी अशी आहेत. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने अगोदर पत्नीवर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.