राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजासाठी ओएसडींची नियुक्ती केली जाते. अनेकदा हे विशेष कार्यकारी अधिकारी ही खासगी सचिव म्हणून देखील कार्य करतात. अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची संख्या अधिक असल्याने अनेक जण त्या पदाचा धाक दाखवून शासकीय विभागात कामे करतात. मात्र, पुण्यात एका तथाकथित ओएसीडीचा भांडाफोड झाल्याचं समोर आलं आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचे भासवून पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे आरोपीचे नाव असून त्याने पुण्यातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावल यांच्या कार्यालयात जाऊन एका गुन्ह्याच्या तपासाबाबत आक्षेप घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचे सांगत त्याने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलीस उपायुक्त रावले यांनी तातडीने खातरजमा केली असता संबंधित व्यक्ती तोतयागिरी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.