सोमवार बाजार काढण्यावरून माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेच्या पतीचा प्रचंड राडा; अतिक्रमण पथक माघारी
सोमवार बाजार काढण्यावरून माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेच्या पतीचा प्रचंड राडा; अतिक्रमण पथक माघारी
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : देवळाली गाव परिसरात अनेक वर्षांपासून भरत असलेल्या सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सुराणा चौक येथे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपा नगरसेविका श्वेता भंडारी यांचे पती निर्मल भंडारी यांच्यामध्ये भर रस्त्यात वाद होऊन प्रचंड राडा व शिवीगाळ झाली. या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला अखेर कारवाई न करता माघारी फिरावे लागले.

नाशिक रोडसह पंचक्रोशीतील शेतकरी, महिला भाजी विक्रेते आणि नागरिकांसाठी देवळाली येथील सोमवार बाजार महत्त्वाचा ठरत असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारावर अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, विक्रेते व ग्राहक यामुळे बाजाराचा विस्तार दत्त मंदिर रोड ते आर्टिलरी सेंटर रोड तसेच महात्मा गांधी पुतळा ते साठे नगरपर्यंत झाला आहे.

सोमवारी सायंकाळी सुराणा चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण पथकासह निर्मल भंडारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर बसलेल्या काही भाजी विक्रेते व महिला विक्रेत्यांचा माल हटवण्यास सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे घटनास्थळी पोहोचले व कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन राडा व शिवीगाळ झाली.

माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी, सोमवार बाजारामुळे अनेक गरीब शेतकरी व महिला विक्रेत्यांचा उदरनिर्वाह होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, अशी भूमिका मांडली. 
तर निर्मल भंडारी यांनी, सुराणा चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या ठिकाणी चार ते पाच हॉस्पिटल असल्याने रुग्णवाहिकांना मार्ग मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने अतिक्रमण हटवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेची नाशिक रोड परिसरात दिवसभर चर्चा रंगली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group