भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. ही माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या एसआयटीकडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे महाराष्ट्रातील 40 ते 45 राजकीय नेत्यांशी संबंध होते. हे राजकीय नेते नियमितपणे अशोक खरात याच्या संपर्कात असायचे. विशेष म्हणजे खरातने राजकीय नेत्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती आणि कोणताही राजकीय निर्णय घेण्याआधी त्यांचा सल्ला घेतला जात होता.
एसआयटीला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपत असल्याने त्याला कोर्टात हजर केले जाईल. त्यापूर्वी एसआयटीकडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरु आहे.