नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे अनेक खळबळजनक कारनामे समोर येत आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जादूटोणा अशा एक ना अनेक खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. सध्या एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भोंदू खरातीच पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे.
खरात याच्या भक्तगणांमध्ये साधे नाही तर बडे मासे होते. यामध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचाही समावेश होता. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सुस्थितील आहे. त्यांच्यापैकी काही भक्त हे भोंदू खरातला आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी न्यायचे, त्याचं मार्गदर्शन त्यांना हवं असायचं. मात्र या व्हिजीटसाठी देखील खरात बक्कळ पैसे उकळायचा. आऊट डोअर व्हिजीट असले तर खरात हा संबंधित लोकांकडून थोडे थिडके नव्हे तर 5 लाख रुपये फी घ्यायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जी व्यक्ती जास्त पैसे देईल, भोंदू खरात हा त्याच्यासोबत जायचा असंही एसआयटी तपासातून आता उघड झालं आहे. पुण्यामधील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती असंही समोर आलं आहे. खरातच्या नवनव्या कारनाम्यांची माहिती उघड होत असून त्यामुळे खळबळ माजली आहे.