नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत असून कस्तुरी मिळवण्यासाठी हरणाची शिकार केल्याचा तसेच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने विविध मुद्दे मांडले.
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या घरातून 6 लाख 53 हजार रुपयांची रोख रक्कम, लॅपटॉप, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर, राजमुद्रा तसेच 31 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय काही पेन ड्राइव्ह आणि डिजिटल डेटा विशेष तपास पथकाच्या हाती लागल्याची माहितीही देण्यात आली.
तपासादरम्यान महिलांच्या शोषणासंदर्भात गंभीर बाबी उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पूजा विधीच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री किंवा पहाटे बोलावले जात असे. त्यावेळी मधामध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खरात विविध विधींमध्ये वापरत असलेल्या वस्तूंचा आणि कस्तुरीचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले की, खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय असून या दृष्टीने तपास सुरू आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, सुनावणीवेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सुनावणीदरम्यान किरकोळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचीही माहिती समोर आली आहे.