नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन ठार, तर तीन जण जखमी झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार रासबिहारी लिंक रोड येथे घडला. याबाबत पोलीस हवालदार केशव भोये यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की कुंभवेश मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीच्या मॅनेजरने कोणत्याही प्रकारची सुरक्षा लेबर क्रिन किंवा सीटबेल्ट न पुरविता मुकेशकुमार बैजनाथ पनिका (वय 22, रा. मु. पो. ता. सरई, जि. सिंगरौली, मध्य प्रदेश) यास एमएच 46 सीयू 6186 या क्रमांकाच्या ट्रेलर गाडीवरील पाईपवर चढून पाईपाला बांधलेले लोखंडी साखळीचे चॅनल सोडण्यास भाग पाडले. मेगा पाईप कंपनी प्रा. लि. (खोपोली, जि. रायगड) या कंपनीने पाईपचे सपोर्ट चॅनल हे नाजूक व हलक्या क्वालिटीचे लावल्याने ते वाकल्याने मुकेशकुमार पनिका हा खाली पडला व त्याच्या डोक्यावर पाईप पडल्याने त्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
अपघाताचा दुसरा प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी हर्षल अरुण ढाकरके (रा. दातीरनगर, एक्स्लो पॉईंट, अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की प्रवीण सुधाकर ढाकरके (वय 16, रा. शिवाजीनगर, सातपूर) हा युवक एमएच 28 बीझेड 8812 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने घराकडे जात होता. त्यावेळी बालाजी पार्कजवळ आला असता एमएच 15 बीके 4608 या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याने प्रवीण ढाकरके याला गंभीर दुखापत झाली. त्याला औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ट्रकचालक अशोक कदम याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.
अपघाताचा तिसरा प्रकार अंबड येथे घडला. फिर्यादी दीपाली मयूर बाबू (रा. निवारा संकुल, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांचे पती मयूर संजय बागूल हे त्यांचे मित्र रामभवन शिवकुमार शर्मा यांच्यासोबत एमएच 15 जेक्यू 1028 या क्रमांकाच्या मोटारसायकलीवर पाठीमागे बसून अंबड गाव येथून फिर्यादीच्या घराकडे येत होते. दुचाकीस्वार शर्मा यांनी भरधाव वेगात वाहन चालवून इंडोलाईन कंपनीसमोर शर्मा यांनी त्यांच्या पुढे चालणार्या अनोळखी मोटारसायकलीवरील चालकाने एमआयडीसी बाजूकडे अचानक वळण्याचा सिग्नल दिल्याने त्याला पाठीमागून जोराची ठोस दिली. त्यात रामभवन व फिर्यादीचे पती हे रस्त्यावर लांबपर्यंत घसरत गेले. त्यात मयूर बागूल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर राम भवन शर्मा यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात राम भवन शर्मा (रा. अंबड गाव) व अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
अपघाताचा चौथा प्रकार पेठ रोड येथे घडला. फिर्यादी संतोष लक्ष्मण बच्छाव (रा. सोनज, ता. मालेगाव) हे त्यांच्या ताब्यातील एमएच 41 व्ही 4005 या क्रमांकाची बोलेरो कार चालवून मालेगाववरून आईला पेठ रोडवरील धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन येत असताना तारवालानगर सिग्नल चौफुली येथून पेठ रोडकडे येत होते. त्यादरम्यान फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागून एमएच 15 जेडब्ल्यू 5624 या क्रमांकाच्या टाटा विंगर मिनी बसच्या चालकाने विरुद्ध बाजूने फिर्यादीच्या गाडीला ओव्हरटेक करून अपघात केला. यात सतीश बच्छाव हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करीत आहेत.
अपघाताचा पाचवा प्रकार इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ घडला. फिर्यादी तौफिक अल्लाउद्दीन पटेल (रा. रिकॉन पॅलेस, खोडेनगर, नाशिक) हे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील सयाजी बाय इनराईज हॉटेलजवळ आले असता एमएच 15 जेसी 6317 या क्रमांकाच्या होंडाई औरा कारवरील अनोळखी चालकाने भरधाव वाहन चालवून फिर्यादीच्या एमएच 15 एचआर 1090 या क्रमांकाच्या मोटारसायकलीच्या मागच्या टायरला जोराची धडक देऊन अपघात केला. त्यात फिर्यादी पटेल यांना दुखापत झाली असून, पायाला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भोये करीत आहेत.
अपघाताचा सहावा प्रकार कॅनडा कॉर्नर येथे घडला. फिर्यादी अनिल मोहन कपाळे (रा. उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, नाशिक) हे मोटारसायकलीने जात होते. कॅनडा कॉर्नर सिग्नलच्या अलीकडे भरधाव आलेल्या एमएच 15 जीआर 6214 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारवरील चालक सचिन अरुण गरुड (रा. म्हसरूळ-वरवंडी रोड, नाशिक) याने मोटारसायकलीला समोरून धडक दिली. त्यात फिर्यादी कपाळे यांना दुखापत झाली असून, मोटारसायकलीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार माळोदे करीत आहेत.