नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गॅस लाईनचे बिल भरण्याचा बहाणा करीत रात्री दूरध्वनीद्वारे संपर्क करून दहा रुपये भरण्यास सांगून फसवणूक करीत मोबाईल हॅक करून विविध बँक खात्यांतील 1 लाख 62 हजार 793 रुपये 70 पैसे ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की गंगापूर रोड येथील पाईपलाईन रोडवरील मेनलो पार्क येथील रहिवासी श्रीधर दत्तात्रय धाराशिवकर (निवृत्त कर्मचारी) यांच्या पत्नी अर्चना या घरी असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास 7061876420 या क्रमांकावर कॉल करा, तुमची गॅस लाईन बंद होईल. ही लाईन चालू करायची असल्यास या क्रमांकावर कॉल करा, असे सांगण्यात आले.
फिर्यादीच्या पत्नीने वरील क्रमांकावर फोन केला असता या इसमाने एमएनजीएल कंपनीतर्फे बोलतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला व मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर 8102068130 या क्रमांकावरून एमएनजीएल अॅण्ड ई कॉन्टॅक्ट अॅप फाईल पाठवून दहा रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने ती फाईल डाऊनलोड करून या इसमाने सांगितल्याप्रमाणे दहा रुपये भरण्यासाठी त्यावर डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डाची माहिती ही भरल्यानंतर फिर्यादीचे एचडीएफसी बँक खाते, कोटक महिंद्रा बँक खाते व एचडीएफसी क्रेडिट कार्ड याद्वारे फिर्यादीचा मोबाईल हॅक करून या इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या या बँक खात्यातील 1 लाख 62 हजार 793 रुपये 70 पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी श्रीधर धाराशिवकर यांनी 7061876420 आणि 8102068130 हे मोबाईल क्रमांक वापरून कॉल करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.