अशोक खरातचा आणखी १ प्रताप उघड;  महादेवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर लेंगिक अत्याचार
अशोक खरातचा आणखी १ प्रताप उघड; महादेवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर लेंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर



नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कौटुंबिक समस्येवर सल्ला घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून बलात्कार करणार्‍या भोंदू ज्योतिषी अशोक खरातविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला ही पती व दोन मुलांसह राहते. पिडीत महिलेचा २५ मे २०१३ रोजी विवाह झाला. त्यानंतर सन २०१४ मध्ये तिला मुलगी झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. तेव्हापासून ही महिला पतीपासून विभक्त राहू लागली. सन २०२२ मध्ये पिडीतेला तिच्या एका नातेवाईकाने मिरगाव येथे अशोक खरात याच्याकडे ईशानेश्वर महादेव मंदिर येथे नेले.

तेव्हा अशोक खरात याने दोघा पती-पत्नीला समजावून सांगितले. त्यामुळे दोघे जण पुन्हा सोबत नांदू लागले. त्यामुळे या दाम्पत्याचा भोंदूबाबावर विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा मार्च २०२२ मध्ये अशोक खरात याला भेटण्यासाठी पिडीत महिला व तिच्या पतीने कॅनडा कॉर्नर येथे ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये गेले. प्रथम भोंदूने त्यांना बराचवेळ त्यांना वेटींगवर बसवले. पिडीतेचा नंबर आल्यानंतर भोंदूने या दाम्पत्याला कॅबिनमध्ये बोलावले. दोघांची जन्मतारीख विचारुन लग्नाची तारीख विचारली. त्यावरुन त्यादिवशी शनिवार होता. आणि हा वार लग्नासाठी चांगला नव्हता. असे सांगितले. आणि यामुळेच तुमच्यामध्ये वाद होतात.

त्यानंतर या दाम्पत्याने आमच्या शेतात कोणते पिक घेतले पाहिजे, असा सल्ला भोंदूबाबाला विचारला. त्यावर भोंदूबाबाने कमी मेहनतीमध्ये जास्त नफा मिळवून देणारी पिके घेण्याचा सल्ला दिला. थोड्या वेळाने या दाम्पत्याला नारळ पाणी आणि काही तरी ज्यूस प्रसाद म्हणून दिला. अशोक खरातकडे फिर्यादी आणि तिचा पती सन २०२२ ते डिसेंबर २०२४ पर्यंत सहा ते सात वेळा खरातला त्याच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी गेले होते. 

ऑगस्ट २०२४ मध्ये हे दाम्पत्य पुन्हा खरातकडे भेटायला आले. त्यावेळी फिर्यादी महिला समोर बसलेली असताना भोंदूने त्यांना काही अडीअडचण आहे का, असे विचारले व पिडीतेच्या पतीला बाहेर जावून बसायला सांगितले. त्यानुसार पिडीतेचा पती बाहेर जाऊन बसला. त्यानंतर खरातने पिडीतेला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायला दिले. आणि त्याच्याजवळ बोलावून घेत एक तांब्याचे भांडे पिडीतेच्या डोक्यावर ठेवून गायत्री मंत्र म्हणायला सांगितला. त्यानंतर अशोक खरात पाठीमागे येऊन उभा राहिला.

त्यानंतर त्याने पिडीतेला मिठीत घेतले. पिडीतेच्या अंगावर हात फिरवत मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. येथून पुढे तुमचे दिवस खूप चांगले असतील, तुमची खूप प्रगती होईल. तु फक्त मी सांगेल त्याप्रमाणे कर असे बोलून त्याने फिर्यादी महिलेला टेबलावर बसायला सांगितले. आणि  पिडीतेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. पिडीतेने विरोध केला असता तु जर कोणाला काही सांगितले तर मी माझ्याकडील शक्तीने तुझ्या मुलांना मारुन टाकेल आणि तुझे आयुष्य उद्ध्वस्त करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या महिलेने आजपर्यंत ही बाब कोणाला सांगितली नव्हती. मात्र भोंदू अशोक खरातविरुद्ध रोजच तक्रारी वाढू लागल्याने पिडीतेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला.

त्यानंतर तिने पतीसह सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून अशोक खरातविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group