खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या राजे बँक्वेट हाॅल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
रात्री १० वाजेच्या सुमारास स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर इंदोरे ता. दिंडोरी येथील एका कुटुंबातील नऊ जण अर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले. यावेळी मंगल कार्यालयाजवळच शेतात असलेल्या एका विहिरीत ती कार जाऊन कोसळली. या कारमध्ये दाम्पत्य, त्यांची कन्या असे एकाच कुटुंबातील तिघे जण, तर त्यांच्याच नात्यातील अन्य महिला, मुलगा, तीन मुली आणि लहानगी पुतणी असे दुसऱ्या कुटुंबातील मिळून नऊ जण होते.
ही घटना समजल्यानंतर नगरपंचायतीचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यास सुरूवात केली. ही विहीर पाण्याने भरलेली असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
मृतांची नावं
सुनील दत्तात्रेय दरगोडे, 34, वडील
रेशमा सुनील दरगोडे, 29, आई
राखी उर्फ गुणवंती सुनील दरगोडे, 10, मुलगी
आशा अनिल दरगोडे, 34, आई
श्रुष्टि अनिल दरगोडे, 14, मुलगी
माधुरी उर्फ श्रद्धा अनिल दरगोडे, 13, मुलगी
श्रेयश अनिल दरगोडे, 11, मुलगा
श्रावणी अनिल दरगोडे, 11, मुलगी
समृद्धी राजेंद्र दरगोडे, 7, पुतणी