खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. ९ जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. आणि घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला.
विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. "जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते," असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?" असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, "आजचा दिवस दिंडोरीसाठी 'काळा दिवस' आहे. एकाच कुटुंबातील नऊ माणसं जाणं ही अत्यंत गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील. विहीर मालकाने घराला कंपाउंड केलं, मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, तिथे संरक्षण भिंत असणं गरजेचं होतं. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती त्यांनी दिली.
विहीर मालकाच्या नातेवाईकांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, विहीर मालकाचे नातेवाईक ॲड. विक्रम राजे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "ही विहीर 1972 पासूनची आहे आणि दुष्काळात याच विहिरीने संपूर्ण गावाला पाणी दिले आहे. विहिरीला जाळी आणि अँगल होते, मात्र ते कोणीतरी काढून नेले. नगरपंचायतीने या रस्त्यावर जाळी बसवावी अशी आमचीही मागणी होती," असे त्यांनी स्पष्ट केले.
मृतांची नावं
सुनील दत्तात्रेय दरगोडे, 34, वडील
रेशमा सुनील दरगोडे, 29, आई
राखी उर्फ गुणवंती सुनील दरगोडे, 10, मुलगी
आशा अनिल दरगोडे, 34, आई
श्रुष्टि अनिल दरगोडे, 14, मुलगी
माधुरी उर्फ श्रद्धा अनिल दरगोडे, 13, मुलगी
श्रेयश अनिल दरगोडे, 11, मुलगा
श्रावणी अनिल दरगोडे, 11, मुलगी
समृद्धी राजेंद्र दरगोडे, 7, पुतणी