ट्रकच्या धडकेत नवी मुंबईतील डॉक्टर महिलेचा मृत्यू !  नाशिक मधील घटना
ट्रकच्या धडकेत नवी मुंबईतील डॉक्टर महिलेचा मृत्यू ! नाशिक मधील घटना
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शहरातील खराब रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि दिवस-रात्र सुरू असलेली अनियंत्रित अवजड वाहतूक यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, त्याचा आणखी एक बळी काल रविवारी रात्री गेला. नाशिक रोड-नगर टाकळी येथील अशोक दिवे यांच्या बंगल्यासमोर झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबईतील डॉ. वंदना भास्कर निकुंभ (वय ५८, रा. नेरुळ) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वंदना निकुंभ या रविवारी रात्री सुमारे १० वाजता आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी गुजरातमधील गोध्रा येथून अमूल कंपनीचे पॅकिंग केलेले दूध घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेल्या TG-12 U-4910 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डॉ. निकुंभ या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.अपघातानंतर त्यांचे चुलत भाऊ दिलीप निकम तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या अपघातानंतर नाशिक रोड-नगर टाकळी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरील रस्ते अत्यंत खराब झाले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. खराब रस्ते आणि वेगाने धावणारे ट्रक यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

नाशिक रोड-नगर टाकळी परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत तसेच शहरातील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group