रस्ते अपघाताच्या वाढणाऱ्या घटना दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. वाढणाऱ्या अपघातांमुळे आणि त्यात झालेला मृत्यूंमुळे कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळत आहे. सिन्नर येथूनही एक रस्ता अपघाताची घटना समोर आली आहे. सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात ही भीषण अपघाताची घटना घडली आहे.
गतिरोधकावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिककडे जाणारा कंटेनर दुभाजक तोडून दुसर्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने सिन्नरकडे येणार्या पिकअपसह एका दुचाकीला त्याने धडक दिली. त्यात पिकअपमधील दोघे व एक दुचाकीचालक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.३१ डिसेंबर) सकाळी ९ च्या सुमारास घडली. मोहदरी घाटातील रस्त्यावर बनवण्यात आलेले गतिरोधक जीवघेणे ठरत असून यापूर्वीही याच गतिरोधकांमुळे अपघात झाले आहेत.
या अपघातात कंटेनर (क्र. एम.एच.४६/ए.आर. २७२५) चे ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर घाटातील दुभाजक तोडून दुसर्या बाजूच्या रस्त्यात जाऊन पलटी झाला. त्याचवेळी समोरून येणार्या पिकअप (क्र. एम.एच.१५/जी.व्ही.७१४९)ने कंटेनरला समोरून धडक दिली. त्यात पिकअपचालक बाळू रंगनाथ व्यापारी (५०, रा. सिडको, नाशिक) व चालकाशेजारी बसलेला अवधूत रामनाथ निर्मळ (२३, रा. निर्मळ पिंप्री, ता. राहता) हे दोघे दुर्दैवाने ठार झाले. अवधूत हा कुटुंबात एकुलता एक होता.
तर पल्सर (क्र.एम.एच.१५/सी.बी.६७९६) ही पिकअपच्या मागून सिन्नरकडे येत असताना तीही कंटेनरखाली दाबली गेली. त्यात पल्सर चालक थॉमस तथा शाजी फर्नांडो (४५, रा. जेलरोड, नाशिकरोड) हा ठार झाला. फर्नांडो हे सिन्नर येथीलच एका ऑटो गॅरेजमध्ये वाहनांना रंगकाम व डेटिंगचे काम करतात. त्यासाठी नेहमीप्रमाणे ते येत असताना या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृतांच्या कुटूंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.